Saturday, June 25, 2022

शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर

*समाजक्रांतिकारक राजर्षी  शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.* 

“ तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ,हयाबदल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो . माझी खात्री आहे की , डॉ.आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत . इतकेच नव्हे  तर एक वेळ अशी  येईल की ,ते सर्व हिंदुस्तान चे पुढारी होतील ,असे माझी मनोदेवता मला सांगते आहे.”
--------- *राजर्षी शाहू महाराज*
आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती . मागासलेल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९२० या आपल्या वाढदिवस प्रसंगी आरक्षणाचा जाहीरनामा काढून एक अप्रतिम अशी भेट करविर संस्थानच्या प्रजेस दिली . 
कागल चे अधिपति जयसींग उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महाराज हे पुत्र . त्यांच्या आई राधाबाईसाहेब यांच्या पोटी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ साली झाला . चौथ्या शिवाजीच्या निधनानंतर  त्यांच्या राणी आनंदीबाई यांनी यशवंतरावास दत्तक घेतले . 
‘राजा हा खरा जनतेचा सेवक असतो; आपल्याला मिळालेले राजेपद,राजेश्वर्य हे विलासात जीवन कंठण्यासाठी नसून प्रजेच्या कल्याणासाठी आहे, याची जाणीव प्रारंभापासून महाराजांना झाली होती, असे दिसते.’
राजाचे हित त्याच्या स्वार्थसाधनात नसून ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते, हा राजनीतीचा मूलभूत पाठ त्यांचे गुरू स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर व दुसरे गुरू रघुनाथराव सबनीस यांनी विद्यार्थीदशेतील महाराजांना दिला होता. राज्यारोहणापूर्वी प्रशासकीय प्रशिक्षण म्हणून आपल्या प्रजेच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी महाराजांनी आपल्या गुरूसमवेत प्रजाभेटीचे दौरे काढले. या दौऱ्यांत खेड्यापाड्यांतील डोंगराळ भागातील गरीब रयतेची दरिद्री अवस्था त्यांनी पाहिली. दाजीपूरपासून पन्हाळ्यापर्यंतच्या दुर्गम भागात हा राजा फिरत राहिला . 
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्य आणि मागासलेल्या लोकांचा उद्धार करणे, हेच आपले जीवित कर्तव्य आहे, असे मानणाऱ्या शाहू महाराजांना महार समाजातील एक तरूण परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेऊन आला आहे, हे समजताच ते स्वत: शोध घेत डॉ. बाबासाहेब राहात असलेल्या परळच्या चाळीत गेले; आणि तेथे त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. एक राजा आपल्याला भेटण्यास आपल्या चाळीत येतो याचे बाबासाहेबांना मोठे आश्चर्य वाटले. महाराजांनी पुढील आयुष्यात डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला साहाय्यच केलेले दिसून येते. शतकानुशतके मूक राहिलेल्या बहिष्कृत समाजाला जागृत करण्यासाठी 'मूकनायक' नावाचे वृत्तपत्र काढण्याचे जेव्हा डॉ. बाबासाहेबांनी ठरविले, तेव्हा त्यांना पहिले साहाय्य महाराजांनी केले होते.
डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर महाराजांचा विश्वास होता. त्यांच्याबद्दल खूप मोठ्या अपेक्षा त्यांनी बाळगल्या होत्या. म्हणूनच १९२० साली माणगावच्या पहिल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या बाबासाहेबांना पाहून महाराजांनी उद्गार काढले होते, "तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगते आहे. " 
महाराजांनी वर्तविलेले हे भविष्य काळाने अचूक ठरविले. महाराज पुढे म्हणाले होते, “आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे ? विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो. 
अश्या थोर विचारवंताची जयंती आहे ,त्यांना नतमस्तक ! थोर कल्याणकारी लोकराजाला मानाचा मुजरा !!

*प्रा.बी. आर. शिंदे ,नेरूळ प -७०६*

No comments:

Post a Comment

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...