कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं.
कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं.
आपण मांसाहारी आहोत म्हणजे काहीतरी खास आहोत असं समजून, परग्रहावरून अवतरल्या सारखे कायम जमिनीपासून चार अंगुळे वर चालत नाहीत, मांसाहारी माणसं.
आपण मांसाहारी आहोत हे जगाला कळावे म्हणून गळ्यात तुळशीमाळेसारखी एखादी खूण घालून वावरत नाहीत, मांसाहारी माणसं.
उभी हयात शाकाहारी माणसांकडे पाहून नाके मुरडण्यात धन्यता मानत नाहीत, मांसाहारी माणसं.
आपण मांसाहारी आहोत हाच सज्जनतेचा पुरावा मानावा असा अट्टाहास बाळगत नाहीत, मांसाहारी माणसं.
मांसाहार हाच कसा ग्रेट आहे, हे सांगण्यासाठी वैज्ञानिक परिभाषेत अवैज्ञानिक दावे करीत नाहीत, मांसाहारी माणसं.
दाण्याने कंच भरलेली शेतातील कणसे पाहून उद्या हे धान्य कुणाचे तरी भक्ष्य होणार म्हणून शोकगीत गात आपल्या हळव्या संवेदनशीलतेचे बटबटीत प्रदर्शन करीत नाहीत, मांसाहारी माणसं.
एरवी कुणाच्या करांगुलीवर लघुशंका करण्याइतकेही औदार्य स्वतःपाशी नसताना उगाच जगाच्या कल्याणा मांसाहाराचा प्रचार करीत फिरत नाहीत, मांसाहारी माणसं.
सर्वांनी खाऊन पिऊन सुखी असावं. आपण जे खावं, प्यावं, ल्यावं त्याचंच अर्घ्य देवाला दाखवून दैवतांचेही मानुषीकरण करावं, इतकं साधं निर्व्याज जगतात, मांसाहारी माणसं.
रानातील झाडाने ऋतुकाळाप्रमाणे फुलांनी डवरावं कधी पानगळीनं शहारावं तसं अगदी ताजं, स्वच्छ निर्मळ जगतात, मांसाहारी माणसं.
No comments:
Post a Comment