तथागत गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी
लुंबिनी येथील सिद्धार्थाच्या जन्मस्थळावर बांधलेला आधुनिक संरक्षक मंडप आणि शेजारी उभा अशोक स्तंभ...
आपला भारत देश हा साऱ्या जगात 'बुद्धाचा देश' किंवा 'बुद्धभूमी' म्हणून ओळखला जातो. तथागत भगवान बुद्धांनाही भारताचे महान सुपुत्र म्हणून ओळखले जाते. आज हजारो वर्षानंतरही साऱ्या जगावर बुद्ध विचारांचा प्रभाव आहे. भगवान बुद्धांचा जन्म इसवी सनापूर्वी ५६३ या वर्षी 'लुंबिनी वन' येथे झाला. लुंबिनी हे स्थान भारताच्या उत्तरेस असलेल्या 'नेपाळ' या छोट्याशा देशात आहे. आजच्या भारतातील कपिलवस्तु (पिप्रहवा) येथील राजा शुद्धोदन आणि त्याची राणी महामाया अथवा मायादेवी यांच्या पोटी भगवान बुद्ध ह्यांचा जन्म झाला. माता महामाया ही प्रसूतीसाठी आपल्या माहेरी देवदह नगरीस जात असताना वाटेत 'लुंबिनी वन' येथे एका शालवृक्षाखाली ती प्रसूत झाली. 'लुंबिनी' प्रमाणेच 'देवदह नगरी' हे भगवान बुद्धांचे आजोळही नेपाळमध्येच आहे.
'लुंबिनी' हे भगवान बुद्धाचे जन्मस्थान. तेथील 'लुंबिनी वन' हे अत्यंत रमणीय स्थान होते. ते कदाचित शुद्धोदनाच्या मालकीचे असावे. मात्र ते शाक्यांच्या गणराज्यात होते हे नक्की. शुद्धोदनाचा तेथे एक राजवाडाही असावा. कपिलवस्तुहून देवदह नगरीस जाणारा रस्ता हा लुंबिनी वनातून जात असे. हे वन स्वर्गीय अशा-चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत असे. तेथील वृक्ष बुंध्यापासून शेंड्यापर्यंत फुला-फळांनी बहरलेले होते. निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरात गात असत; अशा त-हेचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' ह्या ग्रंथात आढळते. सिद्धार्थमाता महामाया ही प्रसूतीसाठी माहेरी निघाली होती. परंतु लुंबिनीवनाचे निसर्गसुंदर आणि शांत वातावरण यामुळे तेथे काही काळ विहार करावा असे महामायाला वाटले. त्याच वेळेस तिला तेथे ध्यान धारणा ही करावयाची होती. त्यासाठी तिने शुद्धोदनाजवळ परवानगी मागितली. या प्रसंगाचे वर्णन महाकवी अश्वघोष आपल्या 'बुद्धचरित' या ग्रंथात करतात 'सा लुम्बिनींनाम् वनान्तभूमि चित्रद्रुमां चैत्ररसाभिरामां। ध्यानानुकूलां, विजनामिधेण तस्मां निवासाय नृपं बभाषे ।।
(अर्थः ध्यानाकरिता योग्य अशा एकान्त वनाच्या इच्छेने नानविध वृक्षांनी युक्त अशा चैत्ररथ उपवनाप्रमाणे सुंदर अशा लुंबिनी वनामध्ये जाण्यासाठी राजाला तिने विनंती केली.)
'लुंबिनी वनामध्ये ध्यान-धारणा आणि विहार करावयाची महामायाची तीव्र इच्छा असल्याचे समजताच राजा शुद्धोदनाने कसे ऐश्वर्य उभारावयास सांगितले त्याचे वर्णन 'ललितविस्तर' या ग्रंथात वाचावयास मिळते. ते कदाचित अतिरंजित असेलही पण बहारदार आहे.
मणिकन कनिषिक्तां लुम्बिनी कारयध्वं
विविधवसने रत्नैः सर्ववृक्षां प्रवेया।
विविध कुसुमचित्रं नन्दनं वा सुराणां
वदत च मम शीघ्रं सर्वमेतं विधाय ।।२००।।
(मराठी स्वैरानुवादः संपूर्ण लुंबिनी वन हिऱ्यांचे आणि सुवर्णांचे मणी यांनी विभूषित करा. विविध प्रकारची फुले, उंची प्रकारची वस्त्रे आणि रत्ने आणि माणके यांनी आच्छादून टाकावी. कारण जगातील सर्वात श्रेष्ठ पुरुष लुम्बिनी येथे जन्म घेणार
आहे.)
अशा ह्या सुंदर रमणीय लुंबिनी वनात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. बौद्ध धम्माचे ज्येष्ठ अभ्यासक आदरणीय धर्मानंद कोसंबी 'भगवान बुद्ध' या ग्रंथात...
No comments:
Post a Comment