About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Sunday, July 7, 2024

धम्मग्रंथांचे पठन म्हणजे अधम्म होय





१. बाह्मणांनी सर्व भर विद्येवर दिला आहे त्यांची अशी शिकवण आहे की विद्याच अथ (सुरवात) आहे आणि विद्याच इती (शेवट) आहे. यापुढे कशाचाही विचार करण्याची आवश्यकता नाही


२. याविरुद्ध बुद्ध सर्वांकरिता विद्या, सर्वांना शिक्षा याचा पक्षपाती होता. याशिवाय मनुष्य प्राप्त ज्ञानाचा, विद्येचा उपयोग कसा करतो यात बुद्धाला अधिक रुची होती. ज्ञानासाठी ज्ञान यात त्याला काही गम्य नव्हते.


३. परिणामस्वरूप त्याचा आग्रह होता की, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे शीलही असलेच पाहिजे. शीलाशिवाय ज्ञान म्हणजे अनर्थाला आमंत्रणच.


४. भिक्खू पटीसेनाला बुद्धाने जे सांगितले त्यात बुद्ध प्रज्ञेच्या तुलनेने शीलाला अधिक महत्त्व देतो हे स्पष्ट आहे.


५. प्राचीन काळी बुद्ध श्रावस्ती येथे वास करीत होते तेव्हा त्याच वेळी श्रावस्ती येथे पटीसेन नावाचा वृद्ध याचक वास्तव्याला होता. तो प्रवृत्तीने मंदमती आणि मूढमती होता. त्याला एका गाथेचे अध्ययन करणेही कठीण होते.


६. अशा स्थितीत बुद्धाने पाचशे अर्हतांनी क्रमाक्रमाने एक एक दिवस त्याला शिकवावे अशी व्यवस्था केली. तीन वर्षे उलटून गेली तरीही त्याला एकही गाथा मुखोद्गत करता आली नाही. 


७. तेव्हा त्या जनपदातील सर्व प्रकारचे लोक (चारही वर्गातील लोक) त्याचे अज्ञान जाणून त्याची निंदा करू लागले. त्याची टवाळी करू लागले. बुद्धाला त्याची दया आली. बुद्धाने त्याला आपल्या निकट बोलाविले आणि मृदु मधुर स्वरात पुढील गाथा कथन केली. "ज्याची वाणी संयत आहे. ज्याचे चित्त संयत आहे. जो कायेने कोणावरही आघात करीत नाही असे आचरण करणाऱ्या माणसाला निर्वाण प्राप्त होते."


८. पटीसेन तथागताच्या करुणेने हेलावला. त्याचे चित्त प्रमुदित झाले. त्याने गाथा पुनरुक्त केली. मुखोद्गत केली.


९. बुद्धाने त्याला पुढे असा उपदेश केला की, "हे वृद्ध भिक्खू, तुला फक्त एकच गाथा अवगत आहे. इतरांना याची माहिती आहे. ते तुझी निदा करतील. म्हणून मी तुला या गाथेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून सांगणार आहे. तू सावधान चित्ताने तो ग्रहण करावा


१०. त्यानंतर बुद्धाने कायेचे तीन अकुशल कर्म, वाणीचे चार अकुशल कर्म आणि चित्ताचे तीन अकुशल कर्म त्याला स्पष्ट करून सांगितले. त्याला हेही स्पष्ट करून सांगितले की या अकुशल कर्मापासून विरत झाल्यास माणसाला निर्वाण प्राप्त होते. बुद्धाने त्याला अशाप्रकारे देशना दिल्याने त्या भिक्खूला सत्याचे ज्ञान झाले. तो अर्हत पदास प्राप्त झाला.


११. याचसमयी पाचशे भिक्खुनी विहारात वास्तव्याला होत्या. त्यांनी बुद्धाकडे आपणा पैकी एकीला पाठविले आणि प्रार्थना केली की, त्यांना धम्मोपदेश देण्यासाठी भिक्खू पाठवावा.


१२. त्यांची प्रार्थना बुद्धाने स्वीकारली. बुद्धाने अशी मनीषा व्यक्त केली की पटीसेनाने त्यांच्याकडे जावे आणि त्यांना धम्मोपदेश द्यावा.


१३. ही व्यवस्था केली आहे हे ऐकल्यावर त्या सर्व भिक्खुनी हसू लागल्या त्यांनी सर्वांनी असे ठरविले की, भिक्खु पटीसेन उद्या आल्यावर त्या गाथेचे उलटे पठन करावे म्हणजे तो वृद्ध भिक्खु गोंधळून जाईल व लज्जित होईल


१४. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भिक्खू आला तेव्हा सर्व लहान थोर भिक्खुनींनी त्याचे स्वागत केले. त्याला वंदन केले. असे करताना त्या एक दुसरीकडे पाहून स्मित करीत होत्या


१५. त्यांनी त्या भिक्खूला आसन प्रदान केले. तो आसनस्थ झाल्यावर त्याला त्यांनी अन्नदान केले अन्न ग्रहण करून कर प्रक्षालनानंतर त्यांनी त्या भिक्खूला धम्मोपदेश द्यावा अशी प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना स्वीकारून भिक्खू पटीसेनाने धम्मासन ग्रहण केले आणि धम्मोपदेशास प्रारंभ केला


१६. "भगिनींनो, मी अल्पबुद्धी आहे. माझे ज्ञान सीमित आहे. मला फक्त एकच गाथा अवगत आहे. मी ती गाथा आपणापुढे कथन करणार आहे. मी त्या गाथेचा अर्थही आपणास स्पष्ट करून सांगणार आहे. तुम्ही हा उपदेश सावधान चित्ताने ग्रहण करावा आणि समजून घ्यावा.


१७. त्यानंतर सर्व युवा भिक्खूंनीनी ती गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु हे काय । त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाही. त्या लज्जित झाल्या त्या दुःखी कष्टी झाल्या त्यांच्या माना लज्जेने खाली वाकल्या.


१८. पटीसेनाने ती गाथा गायिली. ज्याप्रमाणे बुद्धाने त्याला ती गाथा समजावून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाधेचा अर्थ विशद करून सांगितला.

No comments:

Post a Comment

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: भरहुत स्तूप हा भारतातील प्राचीन बौद्ध स्तूपांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तूप आहे. तो मध्य प्रदेश राज्य...