यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है
..... या वाक्याच्या समर्थकांकडे जर वरील प्रश्नांची मुद्देसूद व बिनतोड उत्तरे असतील तर त्यांनी ती जरुर द्यावीत, म्हणजे मी सुद्धा माझी ही पोस्ट जाहीरपणे मागे घेईल. निकोप चर्चा करणे आपल्याला जमले पाहिजे. पण उत्तरे न देता लगेच माझ्यावरच संघी, मनुवादी, काँग्रेसी असा आरोप करुन तसेच मला अण्णा भाऊ साठे विरोधी ठरवून पळून जाऊ नये, एवढीच अपेक्षा.....
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे यांची १ आॕगस्ट रोजीची जयंती साजरी झाली की लगेच अण्णा भाऊ साठे यांनी १६ आॕगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर स्वातंत्र्याच्या विरोधात काढलेल्या मोर्चाचे 'यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी...' हे घोषवाक्य होते, असा प्रचार मातंग समाजात सुरू केला जातो.
काही वर्षापासून हा प्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. विशेषतः फेसबुक आणि व्हॉटसअप युनिर्व्हसिटी आल्यापासून तर हा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला.
परंतु साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे यांनी हे वाक्य खरंच म्हटले आहे का ?
याचा शोध घेण्याचा प्रयत्न मातंग शिक्षक, प्राध्यापकांनी, इतिहास संशोधकांनी, बुद्धीजीवींनी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सुद्धा कधी केला नाही.
काही संघटनांच्या मोठ्या नेत्यांनी सांगितले म्हणजे ते खरंच असणार असे समजून मातंग समाजातील काही मोजके कार्यकर्ते १६ आॕगस्टच्या तथाकथित मोर्चाचा प्रचार करत असतात.
पण हे वाक्य साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे यांनी खरंच म्हटले आहे का, हे शोधण्याचा मी तीन वर्षापूर्वी प्रयत्न केला. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची चर्चा करुन त्यांच्याकडून काही पुरावे, संदर्भ मिळतात का? याचा प्रयत्न केला.
पण कोणाकडेच या वाक्याचा कसलाही पुरावा नसल्याचे सिद्ध झाले.
काही प्रामाणिक विचारवंतांचे, कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की पुरावा नाही म्हणून हे वाक्य खोटे आहे, असे म्हणायचे का ?
प्रत्येक वाक्याचा पुरावा मागायचा असतो का ?
कदाचित हे वाक्य साहित्यरत्न अण्णा भाऊंराव साठेनी म्हटलेच नसेल पण या वाक्याचा मातंग तसेच दलित चळवळीला फायदा आहे. म्हणून या वाक्याच्या सत्यतेचा शोध घेणे योग्य नाही. म्हणून तुम्ही शोध घेणे थांबवा, कारण हे वाक्य आता रुढ झाले आहे.
परंतु प्रश्न केवळ खऱ्या खोट्याचा नाही किंवा दलित समाजाने निर्माण केलेल्या चळवळीच्या फायद्या तोट्याचा सुद्धा नाही. तर साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे सारख्या एका महापुरुषाच्या नावाने या वाक्याचा प्रचार केल्यामुळे मातंग समाजाला, मातंग समाजाच्या भविष्यातील वाटचालीला आणि मुख्यत्वे करुन अण्णा भाऊराव साठे यांच्या प्रतिमेला या वाक्याने धक्का बसतो का ? हा खरा प्रश्न आहे.
आपण कालबाह्य रुढी परंपरांना विवेकाने नाकारतो. मग या नवीन घातक रुढीला का नाकारु नये ?
कारण बहुसंख्य मातंग समाज अजूनही शैक्षणिक दृष्टीने मागास आहे. त्यात मांग समाज अतिशय भावनाप्रधान असल्यामुळे तो कोणाच्याही जोरदार अपप्रचाराला बळी पडतो.
पण निदान मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी व बुद्धीजीवींनी तरी या वाक्याकडे चिकित्सक नजरेने, विवेकबुद्धीने पाहणे अतिशय गरजेचे आहे. असे मला वाटते.
म्हणून या वाक्याच्या समर्थकांनी खालील प्रश्नांची अधिकृत पुराव्यासहित तसेच किमान तर्कशुद्ध बुद्धीने उत्तरे द्यावीत. ही माफक अपेक्षा.....
जर साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे यांनी वरील वाक्य म्हटले असेल आणि १६ आॕगस्ट रोजी मोर्चाही काढला असेल तर या वाक्याच्या समर्थकांनी समकालीन दस्तावेजाचा म्हणजे अण्णा भाऊराव साठे यांनी त्यांच्या कोणत्या कादंबरीत, कथेत, पोवाड्यात अथवा भाषणात या वाक्याचा उल्लेख केला ? किंवा समकालीन वृत्तपत्रे, बाॕम्बे गॕझेट, तत्कालिन पोलिस प्रशासन, मुंबई मनपा प्रशासन किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील कार्यालयामधील ऐतिहासिक तपशीलाचा पुरावा द्यावा. म्हणजे हा वाद संपुष्टात येईल.
साहित्यरत्न अण्णा भाऊराव साठे हे लाल झेंडा घेऊन एका जीपवर उभे आहेत. हा फोटो घेऊन त्याचा संदर्भ या मोर्चाशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. या फोटोचा १६ आॕगस्टच्या दिवसाशी, मोर्चाशी संबंध कसा जोडला जातो हे मात्र समर्थकांना सांगता येत नाही, पण समर्थक ऐकत नाहीत.
साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे भारताच्या स्वातंत्र्यासाठी १९४२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारला भूमिगत राहून सहकार्य करतात, याचा पुरावा आहे. मग शेवटपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक अण्णा भाऊराव साठे हे स्वातंत्र्य मिळाल्यावर अचानक दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्य झूठ आहे, असे कसे म्हणतील ?
साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे हे फक्त भारताच्या स्वातंत्र्याचेच समर्थक नव्हते तर ते मराठी भाषिक राज्याचे सुद्धा तेवढेच कट्टर समर्थक होते. म्हणून तर भाषावार प्रांतरचना करताना मुंबई गुजरातला जोडल्यावर आणि बेळगाव, कारवार, निपाणी कर्नाटकला जोडल्यावर निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे खरे शिल्पकार हे अण्णा भाऊराव साठे हेच ठरतात. मराठी भाषादिन सुद्धा त्यांच्याच नावाने साजरा व्हावा अशी मागणी आज संपूर्ण मातंग समाज करीत आहे.
मराठी भाषिकाचे राज्य निर्माण करण्यासाठी अगोदर देश निर्माण करणे गरजेचे होते. तरच मराठी भाषिकांचे राज्य निर्माण करणे शक्य होते. मग आझादीलाच झूठ म्हणणारे अण्णा भाऊराव साठे अवघ्या दहा वर्षांनी निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला त्याचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी उतरले असते का ?
संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अण्णा भाऊराव साठे अहोरात्र झटले असते का ?
काही वर्षापासून आपण अण्णा भाऊंराव साठेंना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च किताब द्या, यासाठी सरकारला वेळोवेळी निवेदने देतोय, आंदोलने करतोय. एकीकडे आपण अण्णा भाऊराव साठे आझादीला झूठी म्हणाले होते, असे सांगतो आणि दुसरीकडे त्याच आझाद भारताकडून अण्णा भाऊंराव साठेंना भारतरत्न हा किताब द्या अशी मागणी करतोय. हे हास्यास्पद वाटत नाही का ?
या वाक्याचे समर्थक आणखी एक मजेशीर हास्यास्पद कृती करत असतात. दरवर्षी १५ आॕगस्ट स्वातंत्र्यदिन हे समर्थक मोठ्या धुमधडाक्यात आनंदाने साजरे करतात. पण लगेच दुसऱ्या दिवशी यह आझादी झूठी है... म्हणून रडतात. इतर लोक मांगांचे हे नाटक पाहून मनातल्या मनात काय म्हणत असतील ? याचा तरी विचार करा.
आॕगस्ट १९४७ च्या तथाकथित मोर्चा नंतर साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे यांनी अनेक पुस्तके लिहीली. मग त्या एकाही पुस्तकात त्यांनी यह आझादी झूठी है,... या वाक्याचा किंवा १६ आॕगस्टच्या मोर्चाचा दूरवरुन सुद्धा उल्लेख का केला नाही ?
१९५८ मध्ये भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊराव साठे हे अध्यक्ष होते, त्यांचे गाजलेले लिखित भाषण आजही उपलब्ध आहे. त्याच भाषणात अण्णा म्हणतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे. परंतु त्या अत्यंत महत्त्वाच्या भाषणात सुद्धा त्यांनी यह आझादी झूठी है,... या वाक्याचा आणि त्या कथित मोर्चाचा सुद्धा एका अक्षराने उल्लेख केला नाही. याचा अर्थ असा होतो की स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते थेट मृत्यूपर्यंत अण्णांना स्वातंत्र्य मान्य झाले होते, फक्त १६ आॕगस्ट १९४७ या एकाच दिवशी मात्र मान्य नव्हते, या प्रश्नाचे समर्थक काय उत्तर देतील ?
स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्य झूठ कसे ठरते ?
अण्णांना जर खरेच आझादी झूठी आहे, असे वाटत असते तर त्यांनी जेव्हा इंग्लंडच्या संसदेत १८ जुलै १९४७ रोजी भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा कायदा संमत झाला, तेव्हापासूनच आझादीला विरोध करणे सुरु केले असते. पण त्यांनी तसे काहीच केले नाही. याचे तुम्ही काय उत्तर द्याल ?
१५ आॕगस्ट पर्यंत म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत अण्णा भाऊराव साठे आझादी झूठी असल्याविषयी काहीच लिहीत नाहीत किंवा कोठे बोलतही नाही. मग लगेच एकाच दिवसात असे काय घडले, की ज्यामुळे अण्णा भाऊराव साठे यांनी अचानक दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्याच्या विरोधी भूमिका घेऊन थेट मोर्चा काढला ? तो सुद्धा हजारोंचा. एवढे नियोजन एका दिवसात जमले असेल तर त्या आंदोलनात सामील झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी नंतर कोणीतरी या मोर्चाबद्दल लिहीले असते, नंतर तोंडी प्रचार सुरू केला असता, या मोर्चाचे पोलिसांनी तर निश्चित फोटो काढावे लागले असते. नंतर पुन्हा याच घोषणेवर अण्णांनी किंवा मोर्चात सामील झालेल्या असंख्य अनुयायांनी मोर्चे काढले असते. परंतु नंतर असा एकही मोर्चा कोणीही काढला नाही, याचे कारण काय ?
कम्युनिस्ट पक्ष हा लोकशाही शासन व्यवस्था मानत नाही. त्यांना कम्युनिस्ट शासनप्रणालीच मान्य असते. (भारतातील कम्युनिस्ट नंतर बदलले. त्यांनी लोकशाही मान्य केली व निवडणूका सुद्धा लढवू लागले) म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्टांनी भाग घेतला नाही. आर एस एस ने सुद्धा घेतला नाही. कारण त्यांनाही हिंदू राष्ट्र अभिप्रेत होते. हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. त्यावेळी सुद्धा लोकशाही शासन व्यवस्था मान्य करायची किंवा नाही या एकाच मुद्यावरुन कम्युनिस्ट पक्षात बराच खल झाला. परंतु शेवटी जनमत काँग्रेसकडे आहे हे पाहून लोकशाहीयुक्त स्वातंत्र्य कम्युनिस्टांनी मान्य केले व तसा ठराव पक्षाच्या पाॕलिट ब्युरो मध्ये मान्य करुन घेतला. अण्णा भाऊ साठे तर निष्ठावंत कम्युनिस्ट होते, त्यांच्या अपेक्षे प्रमाणेच पक्षाने ठराव सुद्धा केला, मग ते स्वतःला मान्य असलेल्या पक्षाच्या ठरावा विरुद्ध मोर्चा कसा काय काढतील ?
परंतु हा इतिहास सामान्य मातंग समाजाला माहीती नसल्यामुळे आणि अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य विरोधी ठरवून आपल्या पंक्तीत बसवणे सोपे आहे, या हेतूनेच यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है..... या वाक्याचा जन्म झाला.
साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊ साठे हे स्वातंत्र्यप्रेमी कम्युनिस्ट होते. तसेच महत्त्वाचे म्हणजे ते लोकशाहीवादी कम्युनिस्ट होते. हे मातंग समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. कारण साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे स्वतंत्र विचारांचे दृष्टे महापुरुष होते. म्हणून तर फक्त अण्णांनीच धर्म, जात, वर्ण, वर्ग, लिंग भेदाला पूर्णपणे विरोध केल्याचे दिसून येते. आपल्या समग्र साहित्यातून जातधर्मवर्गस्त्रीदास्य अंताची चळवळ फक्त साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा यांनीच चालवली. म्हणून त्यांनी आपल्या चळवळीसाठी स्वजातीच्या लोकांचा सुद्धा आधार घेतला नाही. साहित्यरत्न काॕम्रेड अण्णा भाऊ साठे हे इतर कम्युनिस्टां प्रमाणे कर्मठ काॕम्रेड नव्हते तर ते मानवतावादी पण राष्ट्रनिष्ठ तसेच नवविचारांचे क्रांतिकारक काॕम्रेड होते. हे सुद्धा मातंग समाजाच्या तरुणांना आता समजून घ्यावे लागेल.
दिल्लीतील १५ आॕगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्याच्या कार्यक्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सहभागी झाल्याचा फोटोसहित व व्हीडीओ क्लिप सहित पुरावा उपलब्ध आहे. मग खुद्द बाबासाहेबांना स्वातंत्र्य मान्य होते, म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा स्वातंत्र्याला मनापासून पाठिंबाच दिला होता. पण अण्णा भाऊ साठे यांना मात्र स्वातंत्र्य मान्य नव्हते. असा दोन महापुरुषा मध्येच स्वातंत्र्याच्या संबधी विचारांचा विरोधाभास, मतभेद मातंग समाजच निर्माण करत आहे, असेच इतर समाजाला वाटणार नाही का ?
आता सर्वात महत्त्वाचा तर्क. १९०९ पासूनच भारतात टप्प्याटप्याने राजकीय सुधारणा करायच्या, म्हणून ब्रिटीशांनी १९१९ चा कायदा, १९२९ चे सायमन कमिशन, नंतर झालेला १९३५ चा इंडियन अॕक्ट या सर्व घडामोडीतून हे सूचित झाले होते की भारतात फक्त संसदीय लोकशाहीच येणार हे स्पष्ट होते. कारण खुद्द ब्रिटीशच संसदीय लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते. म्हणून भारतात पुन्हा राजेशाही किंवा कम्युनिस्ट राजवट येणे शक्यच नव्हते. मग १५ आॕगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळून फक्त एक दिवस झालेला आहे. संसदीय लोकशाहीच येणार आहे, हे सर्व भारतीयांना माहीत आहे, भारताची राज्यघटना तयार व्हायची आहे. नंतर नवीन सरकार यायचे आहे, त्यांना काम करण्यासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे त्यावेळच्या देशाची परिस्थिती पाहिली तर किमान पाच वर्षे तरी नवीन सार्वभौम देशाच्या सरकारला काम करु देणे भाग होते. संसदीय लोकशाही नूसार पहिल्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या १९५२ मध्ये. याचा अर्थ स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या पाच ते दहा वर्षांनी दलित, श्रमिक, कामगारांसाठी आझादी सच्ची की झूठी ठरणार होती. मग साहित्याचा सम्राट असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या सारखा महान विचारवंताने किमान दहा वर्षांनी हे स्वातंत्र्य म्हणजे हे सरकार झूठ आहे असा मोर्चा काढला असता. लगेच दुसऱ्या दिवशी मोर्चा काढण्याची एवढी घाई अण्णा करतील का ?
तसेच संसदीय लोकशाहीचे कट्टर समर्थक असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे अण्णा हे लोकशाही स्वातंत्र्याचे समर्थक असतील की विरोधक ?
लढवय्या मातंग समाजाचे सवर्ण व इंग्रज या दोघांकडूनही सारखेच शोषण झाल्यामुळे, तो इतर दलित समाजा पेक्षा विकासात मागे पडला. इंग्रजांनी आणलेल्या १८७१ च्या गुन्हेगारी कायद्यामुळे मातंग समाजाला तीन वेळची हजेरी लागली. चौकशी शिवाय तुरुंगात डांबण्याचा हक्क इंग्रज सरकारला मिळाला. त्याला कोण काम देईना, कामावर सुद्धा घेईना, तो लपून राहू लागला, त्यामुळे संपूर्ण समाज पूर्णपणे उध्वस्त झाला. साहित्यसम्राट अण्णा भाऊराव साठेंनी त्यांच्या फकिरा या जगप्रसिद्ध कांदबरीत या गुन्हेगारी कायद्याचा मांगांना कसा भयानक जाच झाला या संबंधी सविस्तर लिखाण सुद्धा केले आहे. मग क्रूर इंग्रजापासून मिळणाऱ्या स्वातंत्र्याला अण्णा भाऊराव साठे हे विरोध करतील की पाठिंबा देतील ?
मुंबईत राहणारे काॕम्रेड सुबोध मोरे हे आपल्या एका लेखात म्हणतात की स्वातंत्र्याच्या दिवशी अण्णा भाऊ साठे हे आपल्या पत्नीला व मुलीला घेऊन मुंबईतील गेट वे आॕफ इंडिया येथे स्वातंत्र्याच्या निमित्ताने केलेली रोषणाई पाहण्यासाठी गेले होते. मग स्वातंत्र्याच्या आनंद सोहळ्यात सहपरिवार सामील झालेले अण्णा भाऊराव साठे हे दुसऱ्या दिवशी मोर्चा काढतील का ?
काही समर्थकांचे म्हणणे आहे की प्रस्थापितांच्या तत्कालीन वृत्तपत्रांनी अण्णा भाऊराव साठे यांच्या मोर्चाची दखल घेतली नाही. पण माझा प्रश्न आहे की स्वातंत्र्याच्या विरोधात निघालेल्या मोर्चाची महाराष्ट्रातील तत्कालीन शासन, पोलिस प्रशासन तर नक्कीच दखल घेणार, मग समर्थकांनी तेथिल माहीती तरी द्यावी. म्हणजे वाद संपेल. परंतु कोणत्याही सरकारी दस्तावेजात तसेच इंग्रजांच्या कागदपत्रात सुद्धा या मोर्चाचा उल्लेख नाही.
दलितांना, वंचितांना, उपेक्षितांना संपूर्ण न्याय व हक्क देण्यासाठी आजपर्यंतची सर्व सरकारे अपूरे पडले, हे मान्य. परंतु स्वातंत्र्याच्या काळात असलेली दलितांची, आदिवासींची परिस्थिती व भारतीय राज्यघटनेमुळे काही प्रमाणात का होईना, आज बदललेली दलितांची परिस्थिती, याची तरी चिकित्सा करा. केवळ भडकाऊ भाषणे करुन नेतागिरी करण्यासाठी, दुसऱ्यांचे ऐकून मोर्चा, सभा काढून, सोशल मिडीयावर पोस्ट टाकून स्वातंत्र्यप्रेमी अण्णा भाऊ साठेंना देशद्रोही का ठरवता ?
जर अण्णा भाऊ साठे यांना (संसदीय) आझादी झूठ वाटत होती तर त्यांना १६ आॕगस्ट १९४७ या दिवशी कोणती आझादी सच वाटत होती ? हे सुद्धा सदर वाक्याचे समर्थकांनी सांगितले पाहिजे. पण ते सुद्धा त्यांना सांगता येत नाही. लोकशाही राज्यव्यवस्थेला राजेशाही आणि दुसरी म्हणजे कम्युनिस्ट राजवट असे दोनच पर्याय असतात. अण्णा भाऊंना कम्युनिस्टांची हुकुमशाही राजवट व राजेशाही सुद्धा मान्य नव्हती. संसदीय लोकशाहीच मान्य होती. हेच सत्य आहे. म्हणून तर ते १५ आॕगस्टच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी झाले.
संविधान सभेत राज्यघटनेवर चर्चा करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संविधान कितीही चांगले असो, पण ते राबवणारे लोक चांगले नसतील तर संविधान कुचकामी ठरेल.
लोकशाहीतील (आझादी) स्वातंत्र्य हे नेहमी चांगलेच असते आणि चांगलेच राहणार. पण सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, याला महत्त्व आहे. म्हणून मातंग कार्यकर्त्यांनी अण्णांचा आधार घेऊन आझादीवर निरर्थक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा सत्ताधारी लोकांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजे, तेच बाबासाहेबांना अभिप्रेत होते.
भगतसिंग हे कम्युनिस्ट असूनही प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांनी कम्युनिस्ट विचारधारेसाठी नव्हे तर भारतातून इंग्रजांना हाकलून देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हसत हसत फाशी स्वीकारली. म्हणजे भगतसिंग हे राष्ट्रवादी कम्युनिस्ट होते. सेम टू सेम अण्णा भाऊ साठे सुद्धा भगतसिंगांप्रमाणे *राष्ट्रवादी कम्युनिस्ट होते. म्हणून बहुजन, दलित, वंचित, उपेक्षित असणाऱ्या स्त्री पुरुषांचे प्रश्न मांडणारे अण्णा हे मला भारतातील सर्वश्रेष्ठ महापुरुष वाटतात. एवढी प्रचंड सामाजिक व राजकीय जाण असणारे अण्णा देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करुन मोर्चा काढणे शक्यच नाही.
मला असे वाटते की ज्यांना आजची आझादी झूठी वाटते, ते दरवर्षी १६ आॕगस्टला अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा आधार का घेतात ?
जर खरच आझादी झूठी असेल तर स्वतःच्या नावाने रोज आझादी झूठी म्हणत आंदोलन करावे. पोस्ट लिहाव्यात. आमचे काहीही म्हणणे नाही. पण अण्णांचा आधार घेतला तर किमान मातंग समाज पाठीशी येईल, ही चाणक्यनीती आता मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आहे. कारण स्वतःच्या नावाने आझादी झूठी आहे, असे म्हणून मोर्चा काढला तर यांच्यामागे मातंगच काय कोणताही भारतीय जाणार नाही म्हणून अण्णांच्या तोंडी हे खोटे वाक्य टाकून दरवर्षी लक्ष वेधण्याचा स्टंट केला जातो.
मातंग समाजाला काँग्रेस पासून तोडून आपल्या बरोबर जोडणे, हा मुख्य राजकीय उद्देश हे वाक्य निर्माण करणाऱ्याच्या डोक्यात होता. या वाक्याची आयडीया अण्णांच्या निधना नंतर दहा बारा वर्षाने कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघाली!
कारण ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात व संपूर्ण देशात सुद्धा काँग्रेसचीच एकहाती सत्ता होती. जनसंघ किंवा भाजप हा तर एक कमजोर पक्ष होता. त्याकाळी जनता पक्ष, त्यानंतरचा जनता दल हाच काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष होता. दलित तसेच मातंग समाज तेव्हा पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीशी असे. काँग्रेसला एका झटक्यात संपवणे अशक्य होते म्हणून काँग्रेसपासून एक एक जाती तोडत म्हणजे काँग्रेसला हळूहळू अपंग करीत संपवणे हीच रणनीती आखून त्याप्रमाणे दीर्घकालीन काम करणे आवश्यक होते.
दुसरा पर्याय नव्हता. काँग्रेसला संपवण्यासाठी काँग्रेस विरोधक वेगवेगळ्या आयडीया लढवत. भावनेवर आधारित राजकारण करणारे पक्ष जात, धर्म, प्रांत, भाषा यावर लोक आकर्षित होतील अशा घोषणा तयार करत. उदा. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू है,' ' जय महाराष्ट्र ' या भन्नाट घोषणा काढल्या.
महाराष्ट्रात आंबेडकरी नेत्यांना मातंग समाजाला बरोबर घेणे आवश्यक होते म्हणून अण्णा भाऊराव साठे यांच्या नावाने आझादी झूठी म्हणण्याची कल्पना ही घाईघाईने कसलाही मागचा पुढचा विचार न करता काढली गेली आणि मातंग समाजात रुजवण्याचा प्रयत्न सुरु केला. म्हणून आजही हे वाक्य फक्त आंबेडकरी नेते, पक्ष वापरताना दिसतात. पण घाईघाईने व विचार न करता निर्माण केलेल्या या वाक्याला काँग्रेस सहित सर्व पक्षांनी नाकारले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मातंग कार्यकर्ते १५ आॕगस्ट हा आझादीचा दिवस धुमधडाक्यात साजरे करतात, पण विरोधातील लोक सत्ताधारी असतील लगेच दुसऱ्या दिवशी १६ आॕगस्टला आझादी झूठी म्हणतात. पण त्यांचे पक्ष मात्र असे कधी म्हणत नाही, हे सुद्धा यांच्या लक्षात येत नाही.